पुणे

पिंपरी : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन सराईतांना अटक

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वरिष्ठांच्या आदेशानुसार केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन सराईतांना पोलिसांनी दोघांना अटक केली. वाकड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 24) रात्री ही कारवाई केली. शरद बन्सी मलाव (21, रा. शिरूर, जि. पुणे), आशुतोष मिलिंद काळे (22, रा. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार इम्रान रहीम शेख (22, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) हा पळून गेला आहे. आरोपी इम्रान शेख याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केले आहे.

उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांनी शुक्रवारी रात्री वाकड परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. दरम्यान, डांगे चौक येथे एका दुचाकीवरून तिघेजण संशयितपणे जाताना त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, त्यातील एकजण पळून गेला. तर, दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे.

आरोपी शरद याच्यावर हडपसर, रांजणगाव, शिरूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी आशुतोष याच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी 21 जून वैभव नितीन भोईनल्लू (22, रा. शिरूर, जि. पुणे) याच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्यात ते दोघेही फरार होते. वाकड पोलिस तपास करीत आहे.

SCROLL FOR NEXT