पुणे

पिंपरी : करसंवादमध्ये प्रश्नांची सरबत्ती, पहिल्याच उपक्रमात शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  बक्षीसपत्र, मालमत्ता हस्तांतरण कसे करावे, पत्ता बदलण्यासाठी काय करावे, मालमत्ता सर्व्हेक्षण कधी सुरू होणार, महिला मिळकतधारकांसाठी काय सवलत आहे, यासह मालमत्ता धारकांच्या विविध प्रश्नांची सरबत्ती पालिका अधिकार्‍यांवर झाली. नागरिकांच्या शंकाचे निरंसन पहिल्याच करसंवादमध्ये महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकार्‍यांनी केले. पहिल्याच कार्यक्रमाला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.

शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणार्‍या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करसंवादचे आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार हा करसंवाद शनिवार (दि.23) सकाळी 11 वाजता फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून पार पडला. पहिल्याच करसंवादला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह प्रशासन अधिकारी नाना मोरे, महेंद्र चौधरी, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत विरणक, सर्व मंडलाधिकारी, टेक-9 चे सुधीर बोर्‍हाडे उपस्थित होते. पहिल्याच करसंवादमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. 40 नागरिकांनी ऑनलाइन प्रश्न विचारले. तर 8 मालमत्ताधारक प्रत्यक्षात महापालिकेत येऊन ऑफलाइन सहभागी झाले होते. यामध्ये 6 ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. अनेकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात आले.

वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया काय आहे, बक्षीसपत्र, मालमत्ता हस्तांतरण कसे करावे, पत्ता बदलण्यासाठी काय करावे, मालमत्ता सर्व्हेक्षण कधी सुरू होणार आहे. एकाच इमारतींमधील फ्लॅटला वेगवेगळा कर आकारणी का केली जाते? महिला मिळकतधारकांसाठी काय सवलत आहे, अवैद्य बांधकामांची नोंद करता येईल का? शास्ती करासंदर्भातील काही प्रश्न मालमत्ताधारकांनी विचारले. यासह मालमत्ताधारकांनी व्यक्तीगत मिळकतीसंदर्भात आणि कायदेशीर प्रश्नही विचारण्यात आले.

या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन मालमत्ता धारकांच्या शंकाचे निरंसन करण्यात आले. मालमत्ताधारकांना चांगल्या सेवा देण्यासाठी करसंकलन विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आहे. शहरातील मालमत्ताधारकांचा याला प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यामधील चौथ्या शनिवारी दुसरा करसंवाद होणार आहे.
                              -नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT