पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: ओएलएक्सवर घरातील साहित्य विकण्यासाठी जाहिरात देणार्या दोन तरुणांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 5) पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात विक्रम मिलिंद रानडे (28, रा. वानवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील सोफा सेट विकण्याबाबत ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. दरम्यान, आरोपीने त्यांना फोन केला आणि एक क्युआर कोड पाठवला.
त्यांनतर काही टप्प्यात आरोपीने फिर्यादी यांच्या पेटीएमद्वारे 47 हजार 997 रुपये हस्तांतरित करून फसवणूक केली. दुसर्या प्रकरणात हर्षल सुनील शिंपी (27, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रमोद कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड, वॉलरुफ, डायनिंग टेबल, अशा घरगुती वापराच्या वस्तू विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून आरोपीने फिर्यादींना फोन केला. वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून फिर्यादी यांची 27 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.