पुणे

पिंपरी : ऐंशी हजार कापडी राष्ट्रध्वज निकृष्ट

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरी तिरंगा उपक्रम राबविला. त्यासाठी पालिकेने 4 लाख कापडी राष्ट्रध्वजाची खरेदी केली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 80 हजार ध्वज निकृष्ट दर्जाचे आहेत. ते ध्वज पालिका परत करणार आहे. पालिकेने 13 ते 15 ऑगस्ट, असे तीन दिवस घरोघरी तिरंगा मोहीम राबविली. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात 30 इंच बाय 20 इंच आकाराच्या कापडी ध्वजाची 24 रूपये दराने विक्री केली. चार लाख ध्वजापैकी 3 लाख 20 हजार 222 ध्वजाची विक्री करण्यात आली. काही माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी तसेच, संस्थांनी नेहरूनगरच्या गोदामातून 500 ते 2 हजार ध्वज एकाच वेळी खरेदी केले.

पालिकेने शहरातील तीन पुरवठादारांकडून 24 रुपये दराने 3 लाख ध्वज खरेदी केले होते. त्यातील काही ध्वज खराब होते. ते ध्वज परत केले. पुरवठादाराने उपलब्ध करून दिलेले चांगले ध्वज पालिकेने घेतले. तसेच, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1 लाख ध्वज घेण्यात आले. त्यातील 79 हजार 778 ध्वज खराब आहेत. डाग असणे, तिरके कापलेले, अशोकचक्र मध्यभागी नसणे, शिलाई व्यवस्थित नसणे, असे ध्वज परत करण्यात येणार आहे. त्या ध्वजाचा दर 20 रुपये 50 पैसे आहे.

ते कापडी ध्वज परत करणार
पालिकेच्या पुरवठादारांकडून तपासणी करून 3 लाख कापडी चांगले राष्ट्रध्वज घेण्यात आले. उर्वरित एक लाखातील खराब असलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयास परत करण्यात येणार आहे. ज्या ध्वजाची पालिकेने विक्री केली त्याचे बिल अदा केले जाईल, असे मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT