पुणे

पिंपरी : इंग्रजी सुधारण्यासाठी विद्यार्थी गिरवताहेत धडे

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठी माध्यमांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय कठीण जातो. इंग्रजीतील विविध स्पेलिग, व्याकरणाचा अभ्यास व्यवस्थित न झाल्यास त्यांचा इंग्रजी विषयाशी कायमच छत्तीसचा आकडा राहतो. हुशार मुलांची ग्रहण करण्याची क्षमता चांगली असल्याने त्यांना इंग्रजी विषय सुरुवातीला जड गेला तरी नंतर ते या विषयात तरबेज होतात. त्याउलट जी मुले अभ्यासात कच्ची असतात त्यांच्यासाठी इंग्रजी हा विषय कायमच अडचणीचा ठरतो. त्यावर उपाय म्हणून महापालिका शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (पुणे) व पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता कक्ष कार्यरत आहे. त्या अंतर्गत इंग्रजी अध्ययन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये इंग्रजी कविता पाठांतर, स्पेलिंग पाठांतर, इंग्रजीतून कथा, नाट्य, निबंध लेखन, वक्तृत्त्व स्पर्धा आदींचे नियोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम 1 ऑगस्टपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर दररोज परिपाठातून राबविला जात आहे. त्याशिवाय, आठवड्यातून एकदा शिक्षक आवश्यक सराव करून घेत आहेत.

स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
इंग्रजी विषयात मुलांचा सराव किती झाला, त्यांची अध्ययन क्षमता सुधारली का, याची चाचपणी दर दोन महिन्याने केली जाणार आहे. शाळा, केंद्र आणि महापालिका शिक्षण विभाग स्तरावर त्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीविषयी असणारी भीती दूर व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम वर्षभरासाठी राबविला जाणार आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यास नक्कीच मदत होणार आहे.
                  – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग.

SCROLL FOR NEXT