पुणे

पिंपरी : आयुक्त पाटील यांची तडकाफडकी बदली

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची केवळ दीड वर्षात तडकाफडकी बदली मंगळवारी (दि. 16) करण्यात आली. दीड वर्षाच्या अल्प कालावधीत त्यांची बदली झाल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आयुक्त पाटील हे 14 फेब्रुवारी 2021 ला पालिकेत रुजू झाले होते. त्यांची राज्य शासनाच्या मुंबई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सिंह हे सन 2012 च्या बँचचे सनदी अधिकारी आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांनी नियुक्तीचे पत्र मंगळवारी (दि.16) शासकीय सुटीच्या दिवशी काढले आहे.

राज्यातील सत्तांतरामुळे बदली?
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयुक्त पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यांचे सुरुवातीपासून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी खटके उडत होते. आयुक्त मनमानी तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार कारभार करतात, असा आरोप सत्ताधारी भाजपने वारंवार केला होता. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्याने आयुक्तांची बदली होणार, अशी चर्चा होती. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT