पुणे

पिंपरी : अवैध दारूविक्री; नऊ ठिकाणी कारवाई

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अवैध दारू विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पोलिसांनी नऊ ठिकाणी कारवाई केली. यामध्ये 59 हजार 325 रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया करून गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. चाकण आणि रावेत मधून तिघांना दारू विक्री प्रकरणी अटक करून त्यांच्याकडून हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. पिंपरी आणि शिरगाव परंदवडीमधून 17 हजार 700 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मावळ तालुक्यातील इंदुरी येथील फॅन्सीकॉर्नर हॉटेलमध्ये छापा मारून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहा हजार 720 रुपयांचा देशी, विदेशी दारू आणि बिअर असा मद्यसाठा जप्त केला. यामध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. वाल्हेकरवाडी येथील पंजाबी धाबा येथे चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये एकाला अटक करून तीन हजार 335 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. तसेच, त्रिवेणीनगर येथील हॉटेल टॉवर लाईन येथे चिखली पोलिसांनी कारवाई करून विक्रीसाठी ठेवलेला सात हजार 770 रुपयांचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला. या नऊ कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 59 हजार 325 रुपयांचे मद्य जप्त करीत बारा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT