पुणे

पिंपरी : अवकाळी राजकीय पाऊस स्थानिक भाजपच्या पथ्यावर?

अमृता चौगुले

किरण जोशी : 
पिंपरी : राज्यातील अवकाळी राजकीय पावसामुळे स्थानिक परिस्थिती सुपीक झाल्याची चर्चा स्थानिक भाजपच्या गोटात आहे. महाआघाडी राहणार की भाजप पुन्हा सत्तेत येणार याविषयी स्पष्टता नसली तरी या सर्व घडामोडीत भाजपचे 'वजन' किंचित वाढल्याने स्थानिक पातळीवर पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगची भीतीही मावळली आहे. त्यामुळे नेतेही निश्चिंत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत फुट पडल्याने महाआघाडी अडचणीत येऊन राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाचे संकेतही बदलले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता.

हा पराभव जिव्हारी लागल्याने पवार यांनी महापालिकेकडे पूर्ण लक्ष देऊन फासे फेकण्यास सुरुवात केली होती. पवार यांनी जातीने लक्ष घालत पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली. नव्या निवडी करुन बळ दिले जात असतानाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर भाजपची कोंडी करण्यात आली. अंतर्गत नाराजीमुळे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर निघाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे खिंडार पडणार, अशी शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळे संबंधितांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरु झाले होते. त्यातच भाजपच्या ताकदीच्या उमेदवारांच्या प्रभागरचनेत मोठे बदल झाल्याने त्यांची कोंडी झाली होती. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तासंघर्ष भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.
आजारी असतानाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मुंबईत जाऊन मतदान केले.

हे मतदान निर्णायक ठरले. उमा खापरे यांच्या रूपाने शहराला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. या दोन लढायांमध्ये यश मिळाल्यानंतर आता भाजपला सत्तेचे वेध लागल्याने स्थानिक राजकारणाने यु-टर्न घेतला आहे.

बांधावरचे पुन्हा तळ्यात!

अगामी महापालिका निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया जसजशी पुढे सरकू लागली तशी बदलत्या राजकीय हवेचा अंदाज घेऊन इच्छुकांनी तळ्यात-मळ्यात करण्यास सुरुवात केली होती. भाजपचे 20हून अधिक विद्यमान नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची उघडपणे चर्चा त्यावेळी होती. पक्षाकडून कारवाई झाल्यास उमेदवारी अचडणीत येईल म्हणून हे उमेदवार बांधावर येऊन 'वेट अ‍ॅन्ड वॉच'च्या भूमिकेत होते. संधी मिळताच उडी मारण्याचे संकेत त्यांच्याकडून दिले जात होते मात्र, वातावरण फिरल्याने या मंडळींनी जैसे थे… पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

पुढे काय?
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपला जेरीस आणणारी राष्ट्रवादी काँग्रेस सध्याच्या राजकीय स्थितीमुळे संभ्रमावस्थेत आहे. भाजपचे तत्कालीन नगरसेवक विलास मडिगेरी यांनी प्रभागरचनेवर हरकत घेऊन न्यायालयात खिंड लढविली आहे. या रेट्यामुळे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरही निवडणूक आयोगाला त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी लागली आहे. पक्षश्रेष्ठींच्या दौर्‍यानंतर भाजपचे समन्वयक, प्रवक्ते अमोल थोरात यांनी कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पक्षकार्यालयातून प्रयत्न सुरु ठेवले आहेत. छोट्या-छोट्या उपक्रमांतून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करुन काहीशी बॅकफुटवर गेलेली भाजप पुन्हा सध्याचे राजकीय वातावरण पथ्यावर पाडून घेण्याच्या मनस्थितीत आहे.

आडाखे पोहोचले मंत्रिपदावर!
राज्यात भाजपची सत्ता आल्यावर त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत होईलच पण, पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध लक्षात घेता शहराला मंत्रिपद मिळेल, असे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. ते कितपत खरे ठरतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात सत्ता आल्यावर नक्कीच फायदा होणार आहे; मात्र महापालिका निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी आम्ही आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. शहरात गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणूक लढणार आहोत.
आमदार महेश लांडगेे,
शहराध्यक्ष, भाजप

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT