पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोड घेऊन काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबाचा आधार न घेता तसेच पथदिव्यांचा पोल व मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून श्रीगणेशोत्सव मंडळाची उभारणी करावी. विद्युत सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचना कटाक्षाने पाळाव्यात, अधिकृत वीज जोडणी घेऊन हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संजय खाबडे यांनी केले आहे.
दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. महापालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यांमार्फत शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पथ दिव्यांच्या सर्व खांबांची तपासणी करण्यात आली आहे. धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. तथापि, विजेच्या खांबाला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक खांब, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या कामांमध्ये काही उणिवा, त्रुटी आढळल्यास नागरिकांनी सारथी हेल्पलाईन 8888006666 या संपर्क क्रमांकावर किंवा 'सारथी'वर ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्री गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज जोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे.
श्रीगणेशोत्सवासाठी वीजजोडणी पथदिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्स अथवा फिडरपिलरमधून घेऊ नये. अनधिकृत वीज जोडणी टाळावी विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी टाळावी. महापालिकेकडून इमारती व दिवाबत्तीच्या खांबांमधून प्रकाश व्यवस्थेकरीता थ—ी फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केला जातो. नागरिकांनी सुरक्षिततेबाबतच्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.