पुणे

पिंपरी : 150 विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पथ विक्रेते, हातगाडी व फेरीवाला विक्रेत्यांचे गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या सर्वेक्षणास महापालिकेने सुरुवात केली आहे. गेल्या बारा दिवसांत एकूण 150 विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली आहे.
फेरीवाला धोरणानुसार शहरातील फेरीवाल्याचे दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करणे बंधनकारक आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्वेक्षण करून फेरीवाले व विक्रेत्यांची संपूर्ण माहिती अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे अपूर्ण स्थितीतील सर्वेक्षणाचे काम पालिकेने आता सुरू केले आहे.

पालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाने सन 2014 ला फेरीवाल्याचे सर्वेक्षण केले होते. पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या सर्वेक्षणात 9 हजार 25 फेरीवाल्यांनी नोंद झाली. त्यातील कागदपत्रे सादर करणार्‍या 5 हजार 923 विक्रेत्यांचे बायोमेट्रिक नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित 3 हजार 102 विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित आहे.

बायोमेट्रिक नोंदणी पालिकेने 25 जुलैपासून सुरूवात केली आहे. सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात त्या भागातील पात्र विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. आतापर्यंत आठ क्षेत्रीय कार्यालयात सुमारे 150 विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात आली आहे.

काही विक्रेत्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जागी त्यांच्या वारसांची नोंदणी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, नवे विक्रेते कागदपत्रे घेऊन क्षेत्रीय कार्यालयात नोंदणीसाठी चौकशी करीत आहेत; मात्र त्यांची नोंदणी केली जात नाही. सन 2014 मधील पात्र विक्रेत्यांची नोंदणी 30 ऑगस्टपर्यंत केली जाणार आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पात्र जुन्या विक्रेत्यांनी बायोमेट्रिक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT