पुणे

पिंपरखेड पाणीपुरवठा योजनेला मंजुरी; 10 कोटी 33 लाखांचे अंदाजपत्रक व आराखडा

अमृता चौगुले

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पिंपरखेड (ता. शिरूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेस 10 कोटी 33 लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी मिळाल्याची माहिती सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी दिली आहे. पिंपरखेड प्रादेशिक योजनेचा दरडोई खर्च हा विहित निकष पाच कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे या योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी मान्यतेकरिता पाठविला होता.

प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत होणार असलेल्या कामामध्ये जल शुद्धिकरण प्रकल्प आणि सौरऊर्जेवर चालणार्‍या पाणी उपसा मोटारीसह तीन ठिकाणी टाक्या आदींचा समावेश आहे. जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत सौरऊर्जेवर चालणार्‍या उपसा मोटारी, जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरखेड गावातील वाड्या-वस्त्यांवरील घरात नळ कनेक्शनद्वारे सर्वांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून, या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

SCROLL FOR NEXT