पुणे

पावसाळा सुरू आहे द्या लक्ष! जलजन्य आजार टाळण्यासाठी व्हा दक्ष !

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आणि विषमज्वर हे आजार दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे याबाबत दुर्लक्ष न करता लक्ष देणे गरजेचे आहे. या आजारांचा फैलाव टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यायला हवी.

महापालिकेतर्फे नळावाटे करण्यात येणार्‍या पाण्याचा वापर नागरिकांनी पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत. तसेच, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.

नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. उलट्या, जुलाब, ताप आदी आजार झाल्यास वेळीच महापालिकेच्या नजिकच्या दवाखाना किंवा रुग्णालयात उपचार करुन घ्यावे. रुग्णालयांमध्ये त्याबाबत आवश्यक उपचाराची सोय आहे, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी स्पष्ट केले आहे.

पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन त्यानंतर ते गार करुन प्यावे. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या कॉलरा (पटकी), टायफॉईड (विषमज्वर), गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ आदी रुग्णांची माहिती महापालिकेच्या नजिकच्या दवाखाना, रुग्णालयास त्वरित कळवावी.

जेथे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नये, यासाठी सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी, असेही आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT