पुणे : पुढारी वृत्तसेवा: पावसाने ओढ दिल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात डाळींच्या किमती कडाडल्या आहेत. महिनाभरात डाळींच्या भावात पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात डाळींचे दर शंभरी पार पोहोचल्याने साहजिकच सर्वसामान्य घरातील गृहिणींचे बजेट पुरते कोलमडून गेले आहे. सर्वसामान्यांसह सर्वांच्या ताटात दिसणार्या डाळी महागण्याचे प्रमुख कारण हे सध्या पाऊस हे एकमेव आहे.
कारण, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशासह राज्यभरात पन्नास टक्क्यांपर्यंत खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते. मात्र, मान्सून दाखल होऊनही अद्याप अपेक्षित पाऊस सुरू न झाल्याने अवघी 15 ते 20 टक्के क्षेत्रावरच पेरणीची कामे झाली आहेत. तर, उर्वरित भागात पेरण्या लांबणीवर पडल्याने सर्व प्रकारच्या डाळींच्या भावात महिनाभरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. ' अशी शक्यता डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी वर्तविली.
भावात फरक का?
घाऊक बाजारातील भाव आणि किरकोळ विक्रीच्या भावात प्रतिकिलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फरक पडतो. भावांतील चढ-उताराप्रमाणे किरकोळ विक्रीच्या भावांत सातत्य ठेवावे लागते. किरकोळ विक्री करताना पावशेर, अर्धा किलो, एक किलो आदी वजनाच्या प्रमाणात मालाची विक्री केली जाते. ही विक्री करताना प्रत्येक पोत्यामागे दोन किलोची घट येत असते. काही माल हा वजन करताना पडतो. मालाची प्रत दाखवितानाही माल सांडतो, अशा कारणांमुळे होणारे नुकसान भरून काढणे, मालवाहतूक भाडे, जागेचे भाडे, वीजबिल आदी खर्च भागविण्यासाठी घाऊकपेक्षा किरकोळ विक्री करताना जास्त भाव लावावा लागतो, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
मार्केट यार्डातील राज्यनिहाय आवक
डाळी आवक (दररोज) राज्य
तूरडाळ 60 ते 70 टन महाराष्ट्र (विदर्भ, मराठवाडा)
हरभरा डाळ 50 ते 60 टन महाराष्ट्र (मराठवाडा, विदर्भ)
मटकी डाळ 10 टन (दोन दिवसांआड) मध्य प्रदेश, राजस्थान
उडीद डाळ 50 ते 60 टन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश
मूग डाळ 50 ते 70 टन राजस्थान
मसूर डाळ 30 ते 40 टन
सध्याचे दर
डाळी किरकोळ दर (प्रतिकिलो रुपयांत)
तूरडाळ 100 ते 110
हरभर डाळ 60 ते 80
मूगडाळ 95 ते 112
मसूर डाळ 70 ते 75
मटकी डाळ 95 ते 110
उदीड डाळ 100 ते 115