कोथरूड : पावसाच्या तडाख्याने ठिकठिकाणी कोथरूडमध्ये तुटलेली ड्रेनेजची झाकणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेली वाळू – खडी यामुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्वेनगरमधील मुख्य चौक, कॅनॉल रस्ता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवदीप चौक, कोथरूडमधील महर्षी कर्वे स्मारक चौक, भेलकेनगर चौक, वेदभवन परिसर अशा मुख्य ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून, खडी पसरली आहे. काही ठिकाणी चेंबरचे झाकण तुटले आहे तर काही ठिकाणी चेंबर व्यवस्थित आहे, पण चेंबरच्या बाजूने खड्डा तयार झाला आहे.
रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यामुळे खड्डे व चेंबरच्या अवस्थेचा अंदाज येत नाही. वाहने आदळत असल्याने पर्यायाने वाहनचालक खड्डे चुकविण्यासाठी वाहने वळवत असतात. यामुळे वाहतूक कोंडी होत असते, अनेकदा किरकोळ अपघाताचे प्रकार वारंवार घडत असतात. विकासकामे करत असताना डागडुजी योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे, अन्यथा वाहनाचे नुकसान व अपघाताचे प्रकार टाळणे अशक्य असल्याचे वाहनचालकांनी बोलून दाखविले.