इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र देहू संस्थानवरून निघालेला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 3 जुलै) इंदापुरात विसावला आहे. या पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचे काम करणार्या बैलजोडीस रविवारी पडस्थळ गावकर्यांच्या वतीने भीमा नदीत कोटलिंगनाथ मंदिराच्या बाजूला भीमा स्नान घालण्यात आले. या भीमा स्नानासाठी परशुराम रेडके, महेंद्र रेडके, लक्ष्मण मारकड यांनी मोलाचे सहकार्य केले. या वेळी गावकर्यांनी मोठ्या उत्साहात बैलांना उटणे लावून त्यांना स्वच्छ अंघोळ घातली.
बैलांना हलके वाटावे म्हणून नदीमध्ये खोल पाण्यात पोहू घालण्यात आले. पडस्थळचे प्रगतशील बागायतदार परशुराम रेडके यांच्या घरी बैलजोडीची विधिवत पूजा करून त्यांना महिलांनी ओवाळले. या वेळी पांडुरंग मारकड, संदिपान मारकड, बळीभाऊ रेडके, महेंद्र रेडके तसेच गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराज पालखी संस्थान सोहळ्याच्या बैलजोडीचे मालक ज्ञानेश्वर शेडगे व त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते. पडस्थळ गावकर्यांच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला.