बारामती; पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सातत्याने निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने काटेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गुरुवारी (दि. 28) हे काम रोखले. कामाचा दर्जा राखल्याशिवाय काम पुन्हा सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. बारामती ते इंदापुरदरम्यान सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार कामाच्या दर्जाबाबत कमालीचे आग्रही असतात. त्यांचे गाव असणार्या काटेवाडीतील ग्रामस्थ आता एकवटले आहेत. महामार्गासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीतुन माती काढण्याचे काम सुरू आहे.
माती कठीण खडक भाग लागेपर्यंत बागायती जमिनीचे उत्खनन करून त्यावर उत्कृष्ट दर्जाचा मुरूम टाकून रोलिंग करावयाचे आहे. मात्र, संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. निकृष्ट दर्जाचा मुरूम टाकून रोलिंग करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने काटेवाडीला भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे, अनिल काटे, दिलीप काटे, रणजित गायकवाड, शीतल काटे, के. टी. जाधव, मिलिंद काटे आदी उपस्थित होते.