नानगाव : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा सांगूनदेखील काही भागांतील वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची कामे होत नाहीत. गावातील गल्लीबोळात रस्ते होतात. मात्र, वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांवर मुरमीकरणदेखील केले जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभेत धारेवर धरले. पारगाव सा.मा. (ता.दौंड) ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (दि. 27) सरपंच जयश्री ताकवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात दयनीय होत असते. त्यामुळे अशा रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या आधी व्हावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली.
विकासकामांच्या ठिकाणी कामांचा उल्लेख असलेले फलक लावण्यात यावेत, अनेक वर्षांपासून गावात दारूबंदी असूनदेखील गावात चोरून दारू विक्री करणार्यांवर कारवाई करावी, गावात दिवसेंदिवस चोर्यांचे प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजना करावी, रोजगार हमी योजना तसेच नागरी सुविधांबद्दल या वेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. क्रीडांगण, गटार योजना, शुद्ध पाणी, प्रदूषण, प्लास्टिक बंदी याकडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गावात मोठ्या प्रमाणावर गुर्हाळघरे आहेत. त्यात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निमार्ण झाला आहे. ग्रामस्थांना श्वसनाचे, डोळ्यांचे त्रास जाणवत आहेत. त्यामुळे गुर्हाळांना प्लास्टिक वापरावर बंदी घालावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड आकारण्यासह फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ग्रामसभेला अनुुपस्थित असणार्या ग्रामपंचायत सदस्यांवर या वेळी टीका करण्यात आली. या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्या भागातील रस्त्याच्या समस्या आहेत अशा ठिकाणच्या रस्त्यांवर लवकरात लवकर मुरूम टाकला जाईल. तसेच गावातील करवसुलीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.
– जयश्री ताकवणे, सरपंच, पारगाव सा.मा.