पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बराकीत साठवलेले कांदे सडू लागले असून, बाजारभावही समाधानकारक मिळत नाही. गतवर्षी सदोष बियाणे आणि गेल्या काळात पडलेल्या अतिपावसाचा फटका कांद्यांना बसला. यंदा भांडवलही वसूल होणार नसल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकून बराकी रिकाम्या करू लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे या भागांत सर्वाधिक कांदा पीक घेतले जाते.
या परिसरात सर्वाधिक कांदा साठवला जातो. गेल्या वर्षापासून बराकीत साठवलेल्या कांद्याला बाजारभावाची साथ मिळत नाही. गतवर्षी कांदा काढणी सुरू असताना पाऊस पडला होता. शेतकर्यांनी कांद्याला कमी भाव असल्याने बराकीत साठवला. परंतु, एक महिन्याच्या आतच कांदा सडू लागला. शेतकर्यांनी अधिक नुकसान टाळण्यासाठी कांदा मिळेल त्या बाजारभावात विकून टाकला. यंदा देखील तीच परिस्थिती उद्भवली आहे. सतत पडत असलेला पाऊस यंदा कांदा पिकासाठी नुकसानकारक ठरला आहे. कांदा बराकींमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांदे सडू लागले आहेत. बहुतांश शेतकर्यांचे साठवलेले कांदे खराब वातावरणामुळे देखील सडले आहेत.