वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, सिंहगड भागासह पश्चिम हवेलीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. अंगणात खेळणारे लहान मुले, पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वारांवर हे कुत्रे हल्ले करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. खानापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात दररोज तीन ते चार रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना देण्यात येणार्या एआरबी लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रात लसीचा जादा पुरवठा केला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यातील अनेक जण आपली कुत्री सिंहगड, पानशेत भागात सोडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
खानापूर आरोग्य केंद्रात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात वाढली आहे. खानापूर आरोग्य केंद्रासह सिंहगड रस्ता, पुणे भागातील खासगी, तसेच इतर सरकारी रुग्णालयांत कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मणेरवाडीचे माजी उपसरपंच थोपटे म्हणाले, 'पुणे-पानशेत रस्त्यासह ओढे नाल्यांच्या परिसरात मांस, शिळे अन्न फेकले जात आहे. यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे.'
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले तीन ते चार रुग्ण दररोज उपचारासाठी येत आहेत. कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी वेळोवेळी लस देण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने लसीचा पुरेसा साठा केला आहे.
-डॉ. स्वागत रिंढे पाटील,
वैद्यकीय अधिकारी, खानापूर आरोग्य केंद्र