वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, मुठा, सिंहगड खोर्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या आठवडाभरातच पुणे शहर व परिसराची पाणी कपात रद्द होणार आहे. जलसंपदा विभागाने प्रथमच वेळेवर योग्य नियोजन करून पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासलात पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे वरील धरणे रिकामी असताना लवकर भरणार्या खडकवासलातुन मुठा नदीत होणारा विसर्ग उशिरा होणार आहे. गुरुवारी (दि.7) सांयकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 4.93 टीएमसी म्हणजे 16.93 टक्के पाणी साठा झाला होता.
खडकवासला धरणात 38.76 टक्के पाणी साठा झाला आहे. दिवसभरात साखळीत जवळपास एक टीएमसी पाण्याची भर पडली. खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढल्यानेे पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासलात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी लक्ष घालून रिकामी धरणे भरण्याच्या सूचना दिल्या. जलसंपदाने प्रथमच यंदा वेळेवर निर्णय घेतला आहे.खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, खडकवासला धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने पानशेत व वरसगाव धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे.
येत्या आठ- दहा दिवसांत खडकवासला भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कपात मागे घेतली जाईल, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघरच्या डोंगरी पट्ट्यासह सिंहगड मुठा खोर्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. खामगाव मावळ, मालखेड, डावजे, आंबी, सोनापूर आदी ठिकाणचे ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मोसे, आंबी, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने टेमघर धरणात 5.76 टक्के, वरसगावमध्ये 14.58 टक्के व पानशेतमध्ये 19.61 टक्के साठा झाला आहे. चार धरणांत एकूण 4.93 टीएमसी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 7 जुलै 2021 रोजी चार धरणांच्या साखळीत 8.66 टीएमसी म्हणजे 29.73 टक्के पाणी होते.