पुणे

पाटस ठाण्याला मान्यता द्या : आमदार राहुल कुल

अमृता चौगुले

यवत; पुढारी वृत्तसेवा: यवत पोलिस स्टेशनसाठी जागा, दौंड पोलिस स्टेशन व उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी द्या व पाटस पोलिस स्टेशन निर्मितीच्या प्रस्तावास मान्यता द्या, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. या वेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनकडे सुमारे 52 गावांचे, 37 कि.मी. महामार्गालगतचे कार्यक्षेत्र आहे. 1980 साली पोलिस स्टेशनचा विस्तार झाला, परंतु इमारत जुनीच राहिली, त्याभोवती नवीन इमारतीचे बांधकाम झाल्याने पूर्वीची जागा अपुरी पडू लागली आहे.

येथून जवळच शासनाची असलेली जागा पोलिस स्टेशनाला मिळणेचा प्रस्ताव 16 फेब्रुवारी 2022 ला दाखल करण्यात आला आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी पोलिस स्टेशन बांधकामास सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला असून, जागेअभावी अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ही जागा मिळण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, सुधारित आकृतीबंधामध्ये पाटस येथे नवीन पोलिस स्टेशन निर्माण करणेचा समावेश आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने हे पोलिस स्टेशन सुरू करता येणे शक्य आहे. यवत पोलिस स्टेशनच्या नवीन बांधकामास जागा, दौंड पोलिस स्टेशन व उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी निधीच्या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईचे निर्देश दिले.

SCROLL FOR NEXT