पाटस; पुढारी वृत्तसेवा: कुसेगाव गावाच्या पाण्यासाठी सर्वस्व असणारा विजयवाडी तलाव हा तब्बल पाच वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरला. यामुळे कुसेगाव ग्रामस्थांसह पाटस ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. येणार्या उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे गावकर्यांनी सांगितले. दि. 8 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने विजयवाडी तलाव त्यावेळी पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर पाच वर्षांनी बुधवारी (दि. 31) झालेल्या मुसळधार पावसाने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला.
तलावातील पाणी बाहेर पडून या तलावावर पाटसपर्यंत अवलंबून असणारे बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरून जाऊन त्यातील पाणी बाहेर पडून वाहत आहे. तलावातून बाहेर पडणारे पाणी हे ओढ्यामार्फत कुसेगावसह पाटस गावच्या ओढ्यावरील सर्व बंधारे भरण्यास मदत होत असल्याने गावातील बंधारेदेखील तुडुंब झाले आहेत. या बंधार्याचा उपयोग शेतकर्यांच्या विहिरी तसेच कूपनलिका भरण्यास
होत आहे. पुढे हे पाणी पाटस परिसरात जात आहे.
विजयवाडी तलावापासून थोड्याच अंतरावर वनक्षेत्र असल्याने मोर, चिंकारा, हरीण, ससे, कोल्हा हे प्राणी व पक्षी पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग करतात. या तलावाच्या तिन्ही बाजूने डोंगर असल्याने या तलावात बगळा, बदक, चिमणी वेगवेगळ्या पान-कोंबड्या यासारखे पक्षी व विविध प्राणी पाण्याच्या शोधत येत आहेत. त्यांनादेखील या तलावातील पाण्याचा लाभ होत आहे.