पुणे

पाच महिन्यांत वाढले दीड लाख मतदार; पुरवणी मतदार यादीत विक्रमी नोंदणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत गेल्या पाच महिन्यांत तब्बल दीड लाख मतदारांची विक्रमी नोंदणी झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार महापालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 34 लाख 58 हजार 714 इतके मतदार आहेत. 2017 च्या पालिका निवडणुकीला ही मतदारसंख्या 26 लाख 34 हजार 798 इतकी होती. त्यात पाच वर्षांत 8 लाख 23 हजार इतकी वाढ झाली आहे.

आता आगामी पालिका निवडणुकीसाठी दि. 5 जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार ही मतदार यादी निश्चित करण्यात आली. त्यामध्ये दि. 31 मेपर्यंत पुरवणी पध्दतीने नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे. मात्र, या पाच महिन्यांत पुरवणी पध्दतीने नोंदलेल्या मतदारांची संख्या तब्बल दीड लाख इतकी आहे. एकीकडे पाच वर्षांत 8 लाख मतदार वाढले असतानाच पाच महिन्यांत तब्बल दीड लाख मतदार वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होतील, ही शक्यता गृहीत धरून 5 जानेवारीची यादी निश्चित झाली होती. त्यात इच्छुकांनी मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी करून घेतली होती.

त्यामुळे निवडणूक लांबल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी झाल्याने प्रशासनाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच काही भागांत थेट जिल्ह्यातील मतदारांची नावे लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पाच महिन्यांच्या कालावधीत जी मोठ्या प्रमाणात नावे लागली आहेत, ती शहराबाहेरील अथवा बोगस मतदारांची नावे लागली गेली का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. आता प्रारूप प्रभागरचनेवर ज्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत, त्यातूनच नक्की चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सहा प्रभागांत 'महिलाराज'
महापालिकेच्या 58 प्रभागांमधील जी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे, तीत सहा प्रभागांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. यामध्ये गोखलेनगर-वडारवाडी, फर्ग्युसन कॉलेज-एरंडवणे, शनिवार पेठ- नवी पेठ, शनिवारवाडा-कसबा पेठ, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ, घोरपडे पेठ-महात्मा फुले मंडई या सहा प्रभागांचा समावेश आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT