बारामतीच्या पश्चिम भागामध्ये निरा नदीकाठच्या भागातील उसाला हुमणीने अळीने ग्रासले आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील निंबूत, मळशी- वाणेवाडी, मुरूम, थोपटेवाडी, कोर्हाळे, लाटे, खंडोबाचीवाडी, गडदरवाढी, भागातील शेतकर्यांची ऊस, आले, बाजरी ही पिके जागेवरच करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्चून लागवड केलेल्या उसाला लागलेल्या हुमणी अळीने शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, तो हवालदिल झाला आहे.
बारामती तालुक्यातील शेतकर्यांना निरा डावा कालव्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र शेतातील ऊस, आले, बाजरी ही पिके वाळून चालली आहेत. खताची मात्रा वेळेवर देऊनसुद्धा उसाची काळोखी तसेच जाडी काही वाढत नाही. परंतु उसामधील मोठ-मोठी बेटे उन्मळून पडत आहेत, असे प्रश्न शेतकर्यांना पडले होते. मात्र हा सर्व प्रकार हुमनी अळीने होत असल्याचे निदर्शनास झाले.
मागील 3 महिन्यांपासून मुबलक ऊन पडल्याने हुमणी अळीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हजारो रुपयांची मशागत, बियाणे, खत, मजुरी तसेच औषध फवारणी असा लाखभर रुपयाचा खर्च करूनसुद्धा लागवड केलेल्या उसासह, खोडवा ऊस, बाजरी, आले या पिकांना हुमणी अळीने घेरले आहे.
ही अळी पिकांच्या मुळाशी असते व मूळ कुरतडते परिणामी पांढरीमुळे कमी होऊन इतर भागात बुरशी तयार होते. परिणामी, पिकांना लागणारे अन्नद्रव्य पुढे जात नाही आणि पिके पिवळी पडून वाळत जाते. शेतकर्यांना याचा फटका बसला असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्यात तोड झालेल्या बिगर रोगी उसाला त्या वेळी चांगला उतारा मिळाला, त्याच खोडव्याचे सध्या हाल चालले आहेत.
8 ते 9 महिन्यांच्या खोडवा उसालाही हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उभ्या पिकात प्रत्येक मुळाला हुमणी दिसून येत आहे. लागण केलेल्या उसालाही हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याची माहिती शेतकरी मच्छिंद्र लकडे यांनी दिली. दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून हुमणी अळी संदर्भात परिपत्रक काढण्यात आले असून, शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.