पुणे

पर्यटनस्थळांवर बचाव पथके; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमटीडीसी ‘अलर्ट मोड’वर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) विविध पर्यटन ठिकाणांवर मदत कक्ष, बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसाळ्यात घाटमाथ्यावर, समुद्राच्या ठिकाणी तसेच अन्य निसर्गरम्य ठिकाणी गर्दी होत असते. अशा भागात दरड कोसळणे, जमीन खचणे, सेल्फी काढताना अथवा समुद्रात पोहताना भरती आल्याने जीव जाण्याचे अनुचित प्रकार घडले आहेत. अनेकदा जंगल पर्यटनात वाट चुकल्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'पुणे, कोकण विभागात घाटमाथा परिसर मोठ्या प्रमाणात असून गडकोट किल्ले, समुद्र, अभयारण्य अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, जेथे विविध राज्य-जिल्ह्यांबरोबर देश-विदेशातून पर्यटक येत असतात. माळशेज, तारकर्ली, माथेरान, कोकण, महाबळेश्वर या ठिकाणी जाताना घाटरस्ते तसेच धबधबे आहेत. या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. अनेकदा पर्यटक बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या असल्याने पर्यटनस्थळांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे,' अशी माहिती एमटीडीसी विभागातील पुणे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

ते म्हणाले, 'कोरोना प्रादुर्भावानंतर पर्यटनस्थळे पूर्णतः खुली झाली आहेत. पर्यटकांचा ओघ पर्यटनस्थळी वाढला आहे. पाणवठ्यांच्या ठिकाणी पर्यटकांची पसंती असून आरक्षण करण्यास सुरवात झाली आहे. येथील निवासस्थानांमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी धोकादायक ठिकाणांची माहिती देण्यासंदर्भात नियोजन केले आहे. तसेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षावरील संपर्क क्रमांक प्रत्येक निवासस्थानी तसेच गर्दी असणार्‍या ठिकाणी फलकावर दर्शविण्यात येणार आहेत.' माथेरान येथे जंगलसफारी करण्याच्या दृष्टीने पर्यटकांची मोठी गर्दी असते.

अनेकदा या ठिकाणच्या परिसरात भटकंती करत असताना पर्यटक भरकटल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. घनदाट परिसर असल्याने तसेच ढगाळ हवामानामुळे मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क करण्यासाठीदेखील अडचणी निर्माण होतात. अशा ठिकाणी आपत्कालीन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पर्यटनस्थळाच्या परिसरातील माहिती, धोकादायक ठिकाणे आणि तेथील भौगोलिक परिस्थिती याची माहिती पर्यटकांना देऊन भटकंतीला जाताना सूचना देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेे, असेही हरणे यांनी सांगितले.

विविध ठिकाणी सूचनाफलक
पावसाळ्यात कोकणातील समुद्रांच्या ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांचा ओघ जास्त असतो. समुद्राची पातळी तसेच भरती-ओहोटी याची माहिती पर्यटकांना नसते. त्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या ठिकाणी भरती-ओहोटीच्या वेळा सूचित करण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर पर्यटकांना सुरक्षिततेसंदर्भात सूचना दिल्या आहेत.

धोकादायक सेल्फी पॉइंटची माहिती
पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पावसामुळे बंधारे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अशा वेळी पर्यटक अडकून पडण्याची भीती असते. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत पर्यटन विभागाचे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. धबधबे, पाणवठे येथील निसरड्या जागा किंवा धोक्याची ठिकाणे आणि धोकादायक सेल्फी पॉइंट निश्चित करून तेथे प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT