पुणे

पक्षांतरबंदी कायद्याची निघताहेत लक्तरे! दिग्विजय सिंह यांचे टीकास्त्र

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'पक्षांतरबंदी कायद्याची लक्तरे काढली जात आहेत,' अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली. 'केंद्रातील भाजप सरकार हे लोकशाही खरेदी करत आहे. त्यांचा मुळात लोकशाहीवरच विश्वास नाही. त्यांच्याकडून पक्षपातीपणाने व्यवहार केले जात आहेत. धर्माला हत्यार म्हणून वापरले जात असून, बेकायदेशीरपणे घरे तोडली जात आहेत, 'असेही त्यांनी म्हटले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर ते पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी आणि रमेश बागवे आदी उपस्थित होते.

सिंह म्हणाले, 'गोव्यामध्ये ज्या काँग्रेस आमदारांची चर्चा सुरू आहे, गोव्यामध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांपैकी आठ जणांनी एकनाथ शिंदे पॅटर्न वापरला आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यातील किती जणांवर 'ईडी'च्या, 'आयटी'च्या केसेस लावल्या आहेत आणि कोणावर छापे टाकले आहेत त्याची माहिती घ्या, त्यावरूनच समजेल की, भाजपचे हे 'लोकतंत्र' नसून 'धनतंत्र' आहे. या सगळ्या परिस्थितीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात काँग्रेसतर्फे "भारत जोडो यात्रा" हे अभियान राबवले जाणार आहे. हे अभियान काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्ता घराघरांमध्ये जाईल. यामध्ये शहिदांच्या कुटुंबांचा सत्कारही केला जाईल.

'केंद्रातील नेतृत्वाने फडणवीसांचा अपमान केला'
'देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मंत्र्यांनी काम केले, त्यांच्या नेतृत्वाखाली आता फडणवीसांना काम करावे लागत आहे. त्यांची मला दया येत आहे. त्या जागी मी कधीच ते पद स्वीकारले नसते. केंद्रातील नेतृत्त्वाने त्यांचा हा अपमान केला आहे,' असा चिमटाही सिंह यांनी काढला. 'भाजपबरोबर येऊन महाराष्ट्रात शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळाले; परंतु ज्योतिरादित्य शिंदेंना काहीच मिळाले नाही, 'असे दिग्विजय सिंह म्हणाले.

SCROLL FOR NEXT