पुणे

नारायणगाव-वारुळवाडी गटात तिरंगी लढत

अमृता चौगुले

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने पंचायत समितीसाठी नारायणगाव गण हा सर्वसाधारण महिलेसाठी, तर वारुळवाडी गण इतर मागासवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला असून, नारायणगाव- वारुळवाडी गट हा इतर मागासवर्ग पुरुष (ओबीसी) वर्गासाठी जाहीर झाला आहे. त्यामुळे इच्छुक सर्वसाधारण गटातील उमेदवारांच्या स्वप्नावर विरजण पडेल, अशी शक्यता निर्माण झाली असताना नारायणगाव-वारुळवाडी गटासाठी आरक्षित झालेली जागा ही इतर मागासवर्ग पुरुष वर्गासाठी असल्याने व इच्छुक उमेदवारांकडे कुणबीचे दाखले असल्याने लढत आता त्याच उमेदवारांमध्ये होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

नारायणगाव-वारुळवाडी गटातून शिवसेनेकडून नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, राष्ट्रवादीकडून सुजित खैरे, तर भाजपमधून आशाताई बुचके यांचे निकटवर्ती संतोषनाना खैरे किंवा आशिष माळवदकर उभे राहण्याची शक्यता होती आणि तशी चर्चाही रंगत होती. आरक्षण जाहीर झाल्याने व उमेदवारांकडे कुणबीचे दाखले असल्याने अशीच लढत होण्याची चिन्हे गडद झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी नारायणगाव-वारुळवाडी गटातून चर्चेत असलेले सुजित खैरे व बाबू पाटे यांचे मित्रही सारखेच आहेत. सुजित खैरे व बाबू पाटे हे अत्यंत जवळचे मित्र आहेत. बाबू पाटे हे सरपंच होण्यामागे सुजित खैरे यांचे योगदान आहे. मात्र, सध्या परिस्थिती पाहता हे दोन मित्र एकमेकांविरोधात उभे राहिल्यास मतदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

भाजपच्या गोटातून संतोषनाना खैरे किंवा आशिष माळवदकर उभे राहिल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका तिन्ही उमेदवारांना बसणार आहे. कारण, संतोषनाना खैरे, आशिष माळवदकर व सरपंच बाबू पाटे यांनी मागील दिवसांत एकत्र एकाच पक्षात काम केलेले आहे. त्यांना मानणारा मतदारवर्गही सारखाच आहे. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतील, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सुजित खैरे हे जिल्हा परिषदेसाठी उभे राहिल्यास आशाताई त्यांना सर्वतोपरी मदत करणार, असा त्यांनी सुजित खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शब्द दिला होता. मग आता आशाताई बुचके काय निर्णय घेतील, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेले दिलीप कोल्हे हेसुद्धा गटातून उमेदवार म्हणून उत्सुक असून, त्यांचे कामही चालू आहे व त्यातच ते ओबीसी वर्गातून असल्याने व आरक्षण ओबीसी वर्गाला पडल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळेल, अशी आशा त्यांना आहे. ठाकर व माळी समाजामध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून, त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे उमेदवार सुजित खैरे की दिलीप कोल्हे, हे पुढे जाऊन ठरणार आहे. वारुळवाडीचे सरपंच म्हणून काम करणारे राजेंद्र मेहेर तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणारे जंगल कोल्हे हेसुद्धा या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये राजेंद्र मेहेर यांना आशाताई बुचके यांनी गळ घातल्यास ते उभे राहण्याची शक्यता आहे, तर जंगल कोल्हे यांनी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT