पुणे

नारायणगाव : तीर्थक्षेत्र ओझरला विघ्नहरावर पुष्पवृष्टी

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा: तीर्थक्षेत्र ओझर येथे माघ शुद्ध चतुर्थी निमित्त गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडला. भक्तांनी मोरया गोसावींची पदे म्हणत पाकळयांची उधळण केली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विघ्नहर्त्या गणरायाचे मंदिर गाभारा,आवार आणि मंदिराबाहेरील परिसर गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषाने दुमदुमून गेला होता. सगळीकडे वातावरण मंगलमय झाले होते. चौथा द्वारयात्रेसाठी टाळ मृदृंगाच्या गजरात भजने म्हणत सकाळी १० वाजता श्रींची पालखी ओझर येथील आंबेराई येथे रवाना झाली.

तेथे अंबिका माता मंदिरात पृथ्वी- सूर्य पूजा करून श्रींच्या पालखीचे १२ वाजता मंदिरात आगमन झाले. गणेश जन्माचे कीर्तन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील,आळंदी यांनी केले. ग्रामस्थ,देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी,विघ्नराजेंद्र जोशी,जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे,सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त बी.व्ही.मांडे, आनंदराव मांडे आदींनी यात्रेसाठी सुंदर रित्या नियोजन केले.

गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला . गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण मंदिराला फुलांची आरस, विद्युत रोषणाई केली होती. हजारो भाविकांनी रांगेत श्रींचे दर्शन घेतले. जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलीस कर्मचारी तसेच देवस्थानचे व्यवस्थापक ,कर्मचारी यांनी श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे गर्दीचे नियोजन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT