राजेंद्र खोमणे :
नानगाव : वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज होत नाही आणि कांद्याला भाव मिळत नाही, मग कांदा उत्पादक शेतकर्यांनी करायचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. मायबाप सरकार आमच्याही डोळ्यातील अश्रू कोण पुसणार अशी व्यथा सध्या शेतकरी मांडताना दिसत आहेत. सध्या कांद्याचे भाव कोसळेले असून शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे. आज भाव मिळेल, उद्या भाव मिळेल या आशेने शेतकरी वर्षभर वखारीमध्ये कांदा जपून ठेवतो, मात्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे शेवटी शेतकर्यांना कमी भावातच कांदा विकावा लागतो.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याच्या लागणी होतात तर एप्रिल महिन्यात कांद्याची काढणी होत असते. रोपे टाकण्यापासून ते कांदा वखारीमध्ये ठेवण्यापर्यंत एक वर्षाचा कालावधी लागतो. या एका वर्षात अनेक अडचणींचा सामना करत शेतकरी कांदा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हवामानातील होणारे बदल, वेगवेगळ्या रोगांचा प्रार्दुभाव, ढगाळ व पावसाचे वातावरण या सर्वापासून शेतकरी कांदा वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतो.
वर्षभर केलेल्या कष्टाचे मोल होईल, या आशेने तो त्या कांद्याकडे पहात असतो. घराचे काम बाजूला ठेवून पहिल्यांदा वखारीला खर्च करून कांदा ठेवण्यासाठी वखार तयार करतो. कांद्यामधून मिळणार्या पैशावर घराचे काम करू, असे स्वप्न शेतकरी पहात असतो, मात्र ते कधीही पूर्ण हेत नाही. सध्याची कांद्याची परिस्थिती पाहिली तर शेतकर्यांना तोट्याच्या खाईत ढकलण्यासारखे झाले आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना चांगल्या बाजारभाचा कधी दिलासा मिळणार, का हे स्वप्नच रहाणार ?
एकीकडे सगळ्याच वस्तूंच्या किंमती वाढलेल्या असताना शेतमालाला कधी चांगला बाजार मिळणार ? जगाचा पोशिंदा म्हणणार्या बळीराजाला सर्वच बाजूने संकटाने घेरले आहे. उसनवारी करून, कर्ज काढून शेतकरी उत्पन्न घेत असतो. महागाई वाढली तर लगेच ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते, मात्र रात्रं-दिवस कष्ट करणार्या शेतकर्याला जर उत्पादन खर्च मिळत नसेल तर त्याच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार ?
कांदा काढणी झाल्यानंतर तो वखारीमध्ये ठेवला जातो. हजारो रुपये खर्च करून वखारी बांधण्यात येतात. तसेच वखारीत जास्त काळ कांदा राहिला तर त्यामध्ये मोठी घट होते, त्यामुळे कांद्याची घट, भांडवल, कष्ट व विकली जाणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत पडते. सरकारने शेतकर्यांना अनुदान दिले नाही तरी चालेल मात्र त्याने पिकवलेल्या मालाला हमीभाव दिल्यास शेतकरी चांगल्याप्रकारे शेती करून समाधानी जीवन जगेल.
-रमेश बोत्रे, कांदा उत्पादक शेतकरी.