धायरी : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द येथील पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे दवाखाना ते सिंहगड रस्ता या रस्त्यावर पथ दिवे नसल्यामुळे संपूर्ण रस्ता अंधारमय झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील रस्त्यावरून अंधारातूनच प्रवास करणार्या वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या सोसायट्या आहेत. तसेच मुरलीधर लायगुडे रुग्णालय हा महापालिकेचा दवाखाना आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. अंधाराचा फायदा घेऊन महिलांना व नागरिकांना लुटण्याचा प्रकार वाढीस लागला आहे.
अनेक पुरुषांना अंधाराचा फायदा घेऊन चोरी करणार्या महिलांनी व त्यांच्या साथीदारांनी दम देऊन, मारहाण करून लुबाडल्याच्या घटना घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले; परंतु भीतीपोटी कोणी पोलिसांत तक्रार देण्यास जात नसल्याची माहिती मिळून आली. याकरिता येथील रस्त्यावर त्वरित पथदिवे बसवून होणार्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दम देऊन धाक दाखवून लुबाडल्याच्या अनेक घटना या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस घडल्या आहेत, याबाबत त्वरित या रस्त्यावर पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.