नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: नसरापूर परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचार्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हतबल झाले असून ग्रामपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे. नसरापूर (ता. भोर) येथे मोकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे.
शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीस्वार यांना कुर्त्यांकडून लक्ष केले जाते. बर्याचदा घाबरून वाहनधारकांचे अपघात होतात. विशेष म्हणजे ही सर्व कुत्री एकत्र समूहाने राहतात. या समूहांनी स्वत:च्या हद्दी बनविलेल्या असतात. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या कुर्त्यांवर हे समूहाने हल्ला सुरू करतात. रात्रभर एकमेकांवर कुत्री भुंकत असल्याने नागरिकांची झोप उडविण्याचे काम करतात, तर दिवसा पादचार्यांना त्रस्त करतात. सुमारे 20 ते 25 कुत्री बाजारपेठेपासून ते मेन आळीपर्यंत वावरत असल्याचे चित्र आहे. वाहन, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले की, ते अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कळपाने फिरणार्या मोकाट कुर्त्यांमुळे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असल्याने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नसरापूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला ही वस्तुस्थिती आहे. मोकाट कुर्त्यांबाबत लवकरच मासिक बैठकीत चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार आहे.
– हरिभाऊ पवार, ग्रामसेवक नसरापूर.