पुणे

नवी सांगवीत नियोजनशून्य कारभारामुळे वारंवार सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम

अमृता चौगुले

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवी परिसरामध्ये महापालिकेअंतर्गत प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्ते पूर्ण झाले असले, तरी काँक्रीट रस्त्यालगत असलेले पदपथ पाण्याखाली चालल्यामुळे पुन्हा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्यावतीने लाखो रुपये खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची व पदपथांची कामे सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी बनविलेल्या सिमेंट ब्लॉकचे पदपथ नियोजना अभावी पाण्याखाली चालल्यामुळे पुन्हा काम करावे लागत आहे.

प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल होत आहे. सध्या शहर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. ज्या ठिकाणी पदपथ खचले आहेत. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. अशा ठिकाणी पाणी साचून राहते. स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू केली जात आहेत.

जेवढ्या भागामध्ये पाणी साचून राहते, त्या ठिकाणचे सिमेंट ब्लॉक काढून त्या ठिकाणी बारीक खडी टाकून पुन्हा सिमेंट ब्लॉक बसविले जात आहेत. हा काम करुन खेळ मांडला जात आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कामामुळे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.

महापालिकेच्या संबंधित प्रशासनाने रस्ते व पदपथ बनविताना दुर्लक्ष केले. कामे घाईघाईने पूर्ण करण्यासाठी मलमपट्टी केली गेली. मात्र, सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कामाचा दर्जा समोर आला आहे. इंजिनिअर, मनुष्यबळ, यंत्रसामग्री असतानाही प्रशासनाने निकृष्ट कामे करू नयेत. नागरिकांच्या जिवाशी खेळू नये.
– राजू सावळे, नागरिक, जुनी सांगवी

सुरू असलेली कामे स्मार्ट सिटीअंतर्गत नसल्याने महापालिकेकडून कामे सुरू आहेत. मात्र, आम्ही ही सर्व कामे ठेकेदाराकडे दिलेली आहेत. या सर्व कामाचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करीत आहोत. सध्या जी काम सुरू आहेत ती आम्ही पूर्ण करून घेत आहोत. कामे उत्तम दर्जाची करून घेत आहोत.
– विजयसिंह भोसले,
स्थापत्य विभाग, 'ह' प्रभाग

SCROLL FOR NEXT