दापोडी : नवी सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप विद्यालयात ग्रंथदिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या होत्या. त्यासोबतच कपाळाला गंध, टिळा, डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाले होते. नुकताच आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनादेखील तो अनुभव घेता यावा यासाठी विद्यालयाने ग्रंथदिंडी पालखी सोहळा आयोजित केला होता.
ज्ञानबा तुकारामच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी हा पालखी सोहळा विद्यालयापासून फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक, साई चौक परिसरात फिरून साजरा केला. या वेळी चौका-चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ, मृदंग, लेझीम आदी वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला होता.
विद्यार्थ्यांनी हातामध्ये विविध संदेश देणारे फलक घेतले होते. पर्यावरण, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, आदींचे महत्व विशद करणार्या घोषणा देण्यात आल्या. या पालखीचे पूजन विद्यालयाचे प्राचार्या संजना आवारी, शिवाजी पाडुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विठू नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी विद्यालयातील शिक्षक संजय मेमाणे, चंद्रशेखर वाघमारे, वैशाली शिंदे, हेमलता खरमाळे, सुजाता चासकर यासंह अन्य शिक्षक सहभागी झाले होते.