पुणे

पुणे : जागेच्या वादातून दोन गटांत जोरदार मारामारी

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जागेच्या वादातून माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे दोन गटांत जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अण्णा वसंत घुसळकर (रा. विक्रमनगर, माळेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश शंकर पिंगळे, अनिकेत राजेंद्र पिंगळे, सतीश मारुती पिंगळे (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती), मच्छिंद्र नारायण घुसळकर, सोमनाथ नारायण घुसळकर, नीलेश मच्छिंद्र घुसळकर (सर्व रा. भिगवण, ता. इंदापूर) व कबीर नारायण घुसळकर (रा. पुनावळे, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीने 2018 मध्ये मोकळी जागा जाधवराव यांच्याकडून विकत घेतली आहे. या जागेबाबत त्यांचा चुलतभाऊ मच्छिंद्र, कैलास व दीपक घुसाळकर यांच्याशी वाद आहे. दि. 30 जून रोजी आरोपी जागेचा वाद मिटविण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे आले होते. या वेळी गावातील काही प्रतिष्ठित वाद मिटविण्यासाठी उपस्थित होते. आरोपींनी ही जागा आमची आहे, असे म्हणत बैठक संपवली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. गणेशने लोखंडी गजाने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. फिर्यादीची पत्नी, मुलगा, बहीण यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत फिर्यादीच्या डोक्यात तीन टाके पडले असून, मुलगा योगेशच्या कंबरेला फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसर्‍या बाजूने नीलेश मच्छिंद्र घुसाळकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार योगेश अण्णा घुसाळकर, आकाश अण्णा गुसाळकर, अण्णा वसंत घुसाळकर, अविनाश हरिभाऊ घुसाळकर, उमेश अण्णा घुसाळकर, हरिभाऊ अण्णा घुसाळकर, मंगल अण्णा घुसाळकर (सर्व रा. माळेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्यानुसार जागेचा वाद संपविण्यासाठी आयोजित बैठकीत वादग्रस्त जागेतील साहित्य काढून टाका, असे अण्णा घुसाळकर व इतरांना सांगण्यात आले. परंतु, त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे फिर्यादी व इतर लोक ते साहित्य काढत असताना आकाशने लोखंडी गज, योगेशने लाकडी दांडके हातात घेतले. फिर्यादीचे काका कबीर यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. फिर्यादीलाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.

SCROLL FOR NEXT