किरकटवाडी : पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरण साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असली, तरी जून संपत आला तरी जोरदार पावसाला प्रारंभ झालेला नाही. पर्जन्यवृष्टी होत नसल्याने धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या धरणातून पुण्याला पाणीपुरवठा होत असल्याने, पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट गहिरे झाले आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र पर्जन्यवृष्टीच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करून तीन आठवडे होऊन गेले. मात्र, अद्यापही खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला जोर नाही.
सध्या रिमझिम पाऊस अधूनमधून पडतो आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांचे पाणलोट क्षेत्र रायगड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले असल्याने या भागातही नेहमी कोकण कड्यावरून होणारा जोरदार पाऊस अद्यापही सुरू झालेला नाही. ओढे-नाले वाहण्यास प्रारंभ न झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. टेमघर धरण दुरूस्तीसाठी रिकामे केल्याने ते कोरडे पडले आहे. वरच्या बाजूच्या धरणांतून रोज साधारणतः पाचशे क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी खडकवासला धरणासाठी सोडण्यात येत आहे. या पावसाळी वर्षात 1 ते 29 जूनदरम्यान खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 17 मिलिमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 82 मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 78 मिलिमीटर, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
टेमघरला काल दिवसभरात 22 मिलिमीटर पाऊस पडला. अन्य तिन्ही धरणांत एक-दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाचा पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्केही पडलेला नाही. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांची पाणीसाठवण क्षमता 29.15 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. त्यापैकी आज सकाळपर्यंत 2.64 टीएमसी म्हणजे 9.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा 8.60 टीएमसी (29.49 टक्के) होता. धरणसाठा वाढत नसल्याने, पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट गहिरे होत चालले असून, पाणीकपातीची टांगती तलवार जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, तरच टळणार आहे.
पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणीपातळी खालावत चालली असली, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस झाल्यास पाणीपातळीत सुधारणा होईल. पाणीकपातीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाऊ शकतो.
योगेश भंडलकर, सहाय्यक अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे विभाग, स्वारगेट.