पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात स्थलांतरितांचे प्रमाण वाढले, परिणामी मुले शाळेपासून लांब गेली. जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात 209 मुले शाळाबाह्य आढळले, त्यांना पुन्हा शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश आले आहे.
मुख्य प्रवाहात आलेल्या पूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या 209 आहे, त्यातील निम्याहून अधिक 126 मुले हे दौंड या एकाच तालुक्यातील आहेत.
दौंड तालुक्यात साखर कारखान्यांमुळे ऊसतोड कामगार याशिवाय कंपन्यातील कामगार स्थलांतरित होऊन येण्याची संख्या अधिक आहे. परिणामी येथे शाळाबाह्य मुले अधिक आढळून आल्याचे सांगण्यात येते. जुलै महिन्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहीम राबविण्यात आली. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांच्या कालावधीत इतर जिल्ह्यांतून मोठया प्रमाणात कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.
त्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील अनेक मुले शाळाबाह्य झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, केवळ पाच तालुक्यांतच ही 209 मुले आढळली आहेत. बारामती, भोर, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी, पुरंदर, वेल्हे या आठ तालुक्यांत एकही शाळाबाह्य मुले आढळले नाहीत.
दहा लाख मुलांचे सर्वेक्षण…
जिल्ह्यातील 8 लाख 8 हजार 923 कुटुंबातील 10 लाख 23 हजार 775 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 1 ली ते 8 वीतील 6 ते 14 वर्षे वयोगटातील 209 शाळाबाह्य बालके आढळून आली. या बालकांना तत्काळ जवळच्या नियमित शाळेत दाखल करण्यात आले. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी पुणे जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट 5 ते 20 जुलै या कालावधीत राबविण्यात आले.
मिशन झिरो ड्रॉपआऊट उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवी संस्था, तालुका व जिल्हास्तरावरील पदाधिकारी यांचाही सहभाग नोंदविण्यात आला. जिल्ह्यात या मोहिमेसाठी गाव, वाडी, वस्ती ते तालुका व जिल्हास्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.