पुणे

दौंडमधील दोन गुर्‍हाळांवर छापा; ‘एफडीए’कडून लवकरच विशेष मोहीम

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुर्‍हाळ घरांवर छापा मारला आहे. त्या ठिकाणांवरून 2 लाख 19 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात 313 किलो भेसळयुक्त गूळ व भेसळीसाठी वापरली जाणारी 82 हजार 440 रुपयांची 2 हजार 750 किलो साखरेचा समावेश आहे. दौंड तालुक्यातील गुर्‍हाळावर एफडीएकडून सातत्याने कारवाई करून साखर, मुदतबाह्य चॉकलेट, कोको पावडर जप्त केली जाते. जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत सुमारे पावणेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

जानेवारी 2022 मध्ये दोन गूळ उत्पादकांवर छापेमारी करून सुमारे 3 लाख 67 हजार 900 रुपयांचा 7 हजार 162 किलो गुळाचा साठा जप्त केला. त्याचे तपासणीसाठी घेतलेले दोन्ही नमुने प्रयोगशाळेने असुरक्षित ठरवले आहेत. त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. फेब्रुवारी 2022 रोजी हातवळण येथील गूळ उत्पादकावर छापा टाकून गूळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या गुळाचा नमुनादेखील असुरक्षित आढळून असून, त्याप्रकरणी खटला दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

तर, जप्त केलेली साखर नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. जुलैमध्ये गुर्‍हाळ घरांना भेसळीसाठी पुरवठा केली जाणारी 7 लाख 75 हजार रुपयांची सुमारे 25 हजार किलो साखर जप्त करण्यात आली आहे. प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, गैरप्रकार आढळून येणार्‍या गुर्‍हाळ घरावर कारवाई केली जाणार आहे. पुणे जिल्हयातील सर्व गुर्‍हाळचालकांनी कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करून घेऊनच सर्व तरतुदीचे पालन करूनच गूळ उत्पादन करण्याचे आवाहन एफडीएचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले.

SCROLL FOR NEXT