पुणे

देहूत वारकरी दाखल; धर्मशाळा गजबजल्या

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 

'कोरोना सारख्या महामारीतून आपण वाचलो ही विठ्ठलाची कृपा… गावाकडं बरंय का… मुलाचं लग्न झालं का… असे एकमेकांना विचारलेले आपुलकीचे प्रश्न, तर दुसरीकडे एक गावे आम्ही । विठोबाचे नाम ॥ आणिकांचे काम । नाही आता ॥ असे अभंगाचे सूर देहूतील धर्मशाळांतून कानी पडत आहेत. पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने देहूत वारकरी दाखल झाले असून, त्यांचा मुक्काम धर्मशाळेत असल्याने तेथील वातावरण भक्तीमय होवून गेले आहे.

श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत वैष्णव मोठ्या प्रमाणात देहूमध्ये दाखल होत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर वारकर्‍यांना वारीमध्ये सहभागी होता येत आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान सोमवारी (दि.20) होणार असल्याने धर्मशाळांमधून अभंग, भजनाचे सूर येऊ लागले आहेत.

वारी सोहळ्यानिमित्त वारकरी वर्षातून एकदा एकमेकांना भेटतात. त्यामुळे पालखी प्रस्थान होण्यापूर्वी अनेकजण येथील धर्मशाळेत मुक्कामी असतात. पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर एकमेकांसमेवत मजल-दरमजल करत मुखी विठ्ठलाचे नाम घेत पंढरीनगरी गाठतात. विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ते एकत्र असतात. तूर्तास धर्म शाळेमध्ये एकमेकांची गाठ पडल्याने खुशाली विचारताना वारकरी आढळून येत आहेत. कोणी पोथी वाचन, अभंग गायनात तल्लीन झालेले दिसून येत आहे. तर कोणी आपल्या साहित्याची जुळवाजुळव करताना आढळून येत आहे. तर कुणी गप्पा मारण्यात दंग झाल्याचे दिसून
येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT