पुणे

देहू : भागवत धर्माची पताका मोदींच्या हस्ते फडकणार

अमृता चौगुले

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला देहूत येत आहेत. त्यांची ही देहूला पहिलीच भेट आहे. शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मोदींच्या हस्ते येथील स्तंभावर भागवत धर्माची भगवी पताका फडकणार आहे. हा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आल्यानंतर वारकरी वेशातील चारशेजण त्यांच्या स्वागतासाठी तयार असतील. तेथून ते मंदिरात प्रवेश करतील. शिळा मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर भागवत धर्माची भगवी पताका त्यांच्या हस्ते फडकणार आहे. या स्तंभाला गजलक्ष्मी वारकरी पताका ध्वजस्तंभ असे नाव देण्यात आले आहे. स्तंभाच्या पायथ्यास चार हत्ती व चार फुले आहेत.

तेथून 61 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. संपूर्ण स्टीलमध्ये व खालीपासून वरपर्यंत एकच मापाचा गोलाईत खांब आहे. खांबाच्या वरील बाजूस बॉल बेरिंग पुली लावण्यात आली आहे. त्यामुळे वारा कुठल्याही दिशेला असेल तरीही पताका स्तंभाभोवती गुंडाळली जाणार नाही. वार्‍याच्या दिशेने फडकत राहील. अशाप्रकारचे वैशिष्ट्य भारतात सर्वप्रथम या ध्वजस्तंभासाठी वापरण्यात आल्याचे दिलीप नथू आंबेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, या खांबाचे आणखी एक वैशिष्ट्य असून, ते म्हणजे ध्वजस्तंभास लावलेली दोरी दिसणार नाही.

एवन चिक्कीचे मालक रमेशसिंह देवी शंकर व्यास व दिलीप आंबेकर यांनी ही पताका मंदिराला भेट दिली आहे. यावर पताका पंधरा फूट लांब व दहा फूट रुंद असणार आहे. संपूर्ण खांबाचे वजन 1000 किलो आहे. कुठल्याही मंदिरात लागणारा एवढा मोठा खांब व त्यावरील पताका हे वैशिष्ट्य ठरणार आहे. याची सर्व डिझाईन्स आंबेकर यांनी तयार
केले आहे.

हेलिपॅड व मंडप
माळवाडी नजीक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लष्कराच्या जागेवर मोठा मंडप उभारला आहे. मध्यभागी स्टेज असून तीनशे बाय शंभरचा मंडप आहे. असे दोन मंडप व दोन्ही बाजूला छोटे मंडप आहेत. येथून शंभर मीटर अंतरावर तीन हेलिपॅड बनवण्यात आले आहेत. मोदी यांचे हेलिकॉप्टर व पायलट हेलिकॉप्टर असे तीन हेलिकॉप्टर येण्याची शक्यता आहे. येथून सभास्थळी येण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.

नमो इंद्रायणी…
पंतप्रधान मोदींनी गंगा स्वच्छतेची शपथ घेतली. त्यास नमामि गंगे असे म्हटले गेले. त्यामुळे इंद्रायणी नदी विशेष करून स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इंद्रायणीच्या पलीकडील तीरावर साफसफाई स्वच्छता व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. दोन्ही घाट स्वच्छ करण्यात येणार आहेत. नमो इंद्रायणी असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT