पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे. जुन्नर तालुक्यात देशातील सर्वांत मोठा बुद्ध लेणी समूह असून, त्याचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करून देशातील पहिले पुरातत्त्व म्युझियम उभे केले जाणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागाच्या पुढाकाराने हे आगळेवेगळे संग्रहालय पुण्यनगरीजवळ साकारले जाणार आहे.
म्युझियमचे काम पुण्यातील डेक्कन विद्यापीठाच्या देखरेखीत होत असून तसा करारही लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही कामांची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. जुन्नर नगरपालिकेने म्युझियमसाठी तीन इमारती दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसराला अडीच हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. सातवाहन काळातील ग्रीक व रोमन संस्कृतीची ओळख डेक्कन कॉलेजच्या इतिहास व संशोधन विभागाने केलेल्या उत्खननातून जगासमोर आली आहे. इथे नाणेघाट ते पैठण सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. याच्या खुणा आजही संशोधनातील नोंदीवर स्पष्ट दिसतात. असा जागतिक वारसा असलेल्या जुन्नर तालुक्यात म्युझियम उभारून हा वारसा जतन करावा, यासाठी केंद्रात पाठपुरावा केला जात होता. सोलापूरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या संग्रहालयाचे काम होत आहे.
मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची खासदार गिरीश बापट यांनी पुन्हा भेट घेऊन प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केली. मंत्र्यांनी अधिकार्यांना अभ्यास करून अहवाल करण्याचे आदेश दिले. प्रस्तावावर विचार होत असल्याचे दिसताच बापट यांनी डेक्कन कॉलेजने पूर्वी सादर केलेल्या प्रकल्पाची फाईल काढून मंत्र्यांसमोर ठेवली. ही सर्व प्रोसेस होईपर्यंत अधिकार्यांनीही ग्रीन सिग्नल दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटनमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करीत महाराष्ट्रातील पुरातत्त्व विभागाच्या म्युझियमला 300 कोटींचा निधीही दिला. लवकरच केंद्रीय पर्यटन विभाग आणि डेक्कन विद्यापीठ कुलगुरू प्रमोद पांडेय व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यामध्ये करार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
'डेक्कन'ची नजर….
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. या म्युझियमचे काम पुण्याच्या डेक्कन कॉलेज इतिहास संशोधक व पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखालीच होण्यावर भर देण्यात आला आहे.
म्युझियममध्ये काय आहेे…
जुन्नर नगर परिषदेकडून त्यांच्या मालकीच्या तीन इमारती दिल्या आहेत. त्या इमारतीत प्राचीन स्मारके, वारसा, उत्खननातून सापडलेले अवशेष विद्यार्थांच्या अभ्यासासाठी तयार होत आहे. जुन्नर हे प्राचीनकाळी मोठे ट्रेड सेंटर होते. कल्याण ते नालासोपारा, जुन्नर ते पैठण आणि जुन्नर ते नाशिक असा व्यापारी ट्रँगल होता. रिसोर्सेस असताना मानवी वसाहत व जडणघडण कशी झाली याचे उत्खननातील पुरावे अभ्यासासाठी ठेवले जाणार आहे.
15 दिवसांपूर्वी बैठकीत मंजुरी
पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री व त्यांच्या खात्याचे सचिव, गिरीश बापट, डेक्कनचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांची बैठक झाली. बैठकीतच मंजुरी देण्यात आली आणि त्यातील काही कामांच्या निविदा काढून कामाला सुरुवातही झाली. हा प्रकल्प विद्यमान पुरातत्त्व विभागाचे प्रमुख पांडुरंग साबळे यांच्या देखरेखीत होणार आहे. गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीदरम्यान म्युझियम उभारणीची घोषणा करणार असल्याचे समजते.
सोलापूर व आमच्या अभिमत विद्यापीठाचा संयुक्त प्रोग्राम आहे. प्राचीन काळातील स्मारकाचे अध्ययन, अवशेष याची माहिती बरोबर मानव वसाहत, जडणघडण कशी झाली, याची सचित्र माहिती यात असणार आहे. दोन्ही विद्यापीठांच्या पुरातत्व विभागाने यावर काम केले आहे.
– ज्ञानेश्वर साबळे,
विभाग प्रमुख डेक्कन कॉलेज, पुणे