दिगंबर दराडे
पुणे : देशात नव्याने तब्बल पंचाहत्तर डिजिटल बँकांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. डॉ. कराड म्हणाले, 'महाराष्ट्राला चार बँका मिळाल्या असून मुंबई, औरंगाबाद, सातारा, नागपूर जिल्ह्यात या बँका उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सुविधा, प्रामुख्याने ऑनलाईन व्यवहार पारदर्शक करण्यावर या बँकांचा भर राहणार आहे.
देशात डिजिटल व्यवहार अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केलेल्या आहेत. देशातील अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची सुविधा सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिजिटल बँकिंगची प्रत्यक्षात शाखा नसते. यातील व्यवहार पूर्णपणे ऑनलाइन इंटरनेटद्वारे होतात. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी बँका निर्माण करणे आवश्यक आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.'
देशात सर्वच क्षेत्रांत डिजिटल क्रांती होत आहे. त्यामध्ये बँकिंग क्षेत्र मागे राहू नये, याकरिता अर्थमंत्रालय पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल बँकांचा संकल्प करण्यात आला आहे. लवकरच या बँका सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशात 75 बँका सुरू करण्यात येणार आहेत. यातील चार बँका महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहेत.
– डॉ. भागवत कराड,अर्थ राज्यमंत्री, केंद्र सरकार