वाघोली, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकावर दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष झाल्यामुळे झाडे सुकून गेली आहेत. वाळलेली झाडे दुचाकीचालकांना त्रासदायक ठरत आहेत.
वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकामध्ये रोटरी क्लब ऑफ वाघोली व वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपूर्वी वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटा या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली होती.
त्यानंतर रोटरी क्लब ऑफ वाघोली व वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने झाडांची देखभालदेखील केली, परंतु वाघोली गाव महापालिकेत गेल्यानंतर झाडांची देखभाल करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. याबाबत रोटरी क्लब ऑफ वाघोली, वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन व ग्रामस्थांच्या वतीने ऑनलाईन तक्रार देण्यात आली होती.
त्याबरोबर भाजप युवा मोर्चाचे अनिल सातव पाटील यांनीदेखील क्षेत्रीय कार्यालयाकडे झाडांचे संगोपन करावे, अशी मागणी वारंवार केली होती. त्यानंतर संबंधित अधिकार्यांनी झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासन दिले होते. जोराच्या वार्याने वाळलेली झाडे व छोट्या अणकुचीदार फांद्या हवेत उडून विशेषतः दुचाकीधारकांना डोळ्यांबरोबरच अन्य शरीराच्या इजा पोहचवत आहेत. वाळलेली झाडे काढून त्याठिकाणी नवीन झाडांचे रोपण करावे व त्याचे संगोपन करावे, अशी मागणी अनिल सातव पाटील यांनी केली आहे.