दिवे; पुढारी वृत्तसेवा: मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसाने दिवे (ता. पुरंदर) परिसरातील डोंगरालगतच्या शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या बहाराच्या स्थितीमध्ये शेतातील उभी पिके अधिकच्या पावसाने सडली आहेत. शेतातील उभे पीक आता हातातून गेल्याची चिंता शेतकर्यांना पडली आहे.
सततच्या पावसाने शेती मशागतीची कामे रखडली आहेत. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. आधीपासूनच दिवे परिसराला दुष्काळाचा तर कधी अतिपावसाचा फटका नेहमी बसत आला आहे. दिवे गावचा बहुतांश भाग डोंगरी आहे. डोंगरावरून वाहून येणार्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने सीताफळ काळे पडू लागले आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाटाणा, घेवडा शेवटची घटका मोजत आहेत. अंजिरावर करपा, तांबेरा होण्याची शक्यता आहे.