पुणे

दापोडीतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प 15 दिवसापांसून बंद

अमृता चौगुले

दापोडी : येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प 15 ते 20 दिवसांपासून बंद आहे. प्रकल्पाच्या टँकमध्ये शेवाळे आलेले दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे पवना नदीलगत राहणार्‍या अनेक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास करावा लागत आहे. महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पजवळ महावितरणचे काम सुरू आहे; पण नियोजनशून्य काम सुरू असल्याचे दिसत आहे. ट्रास्फार्मरच्या बाजूला अदांजे 60 फुटांची लांबी तर 40 खोल खोदाई केल्याने ट्रान्सफार्मर खचला आहे.

दुसरा ट्रान्सफार्मर नसल्याने तसेच कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने मागील 15 ते 20 दिवसांपासून मैला जमा झाला आहे. मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदी दुषित होवून याचा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मैलाशुद्धीकरण प्रकल्पावर त्वरित कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच, सांगवीत पवना नदी जवळच्या भागात अनेक फुटलेले चेंबर आहेत. या निकृष्ट दर्जाच्या चेंबरमधूनही गेली सहा महिन्यांपासून मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत मिसळत आहे. संबंधित प्रशासनाने पवना नदीची पाहणी करून किती ठिकाणी मैलामिश्रित पाणी नदीत मिसळले जात आहे याची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील, कार्यकारी अभियंता (पर्यावरण विभाग), प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदी विभागांना निवेदन दिले आहे. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणातील संबंधित दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अन्याथा मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.
– राजू सावळे, उपाध्यक्ष, मनसे

नागरिकांच्या जीवाची पर्वा प्रशासनाला नाही. आठ दिवसांपासून प्रकल्पाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दापोडी, सांगवी नदी किनारी राहणार्‍या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
– दीपाली कणसे, रहिवासी दापोडी

पर्यायी रोहित्राची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसामुळे कामामध्ये व्यत्यय येत होता. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांत प्रकल्प सुरू होईल.
– संजय कुलकर्णी, शहर अभियंता, पर्यावरण विभाग

SCROLL FOR NEXT