पुणे

दापोडी : जुनी सांगवीतील टपाल कार्यालयाची दुरवस्था

अमृता चौगुले

दापोडी : जुनी सांगवी येथील श्री हाईट्स इमारतीच्या तळमजल्यावर असणार्‍या टपाल कार्यालयाची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील टपाल कार्यालयात गेली काही दिवस स्लॅबमधून दिवसभर गळती होत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. गळती होत असलेले हे पाणी शौचालयाचे असल्याने अक्षरशः दुर्गंधी पसरत आहे. त्यातच उंदरांचा वावर होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यामुळे टपाल कार्यालयातील महिला अधिकारी खुर्चीवर चक्क मांडी घालून कामकाज करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गेली काही दिवस स्लॅबमधून गळती होत असल्याने दररोज सकाळी टपाल कार्यालय उघडल्यावर अक्षरशः दुर्गंधीचा सामना अधिकार्‍यांना करावा लागत आहे. स्वच्छता कर्मचारी दुपारी बारानंतर येत असतात. त्यामुळे सकाळी कार्यालयात गळती होऊन फरशीवर साचलेले पाणी स्वतः अधिकारीच पुसून काढत आहेत.

येथील कार्यालयात 20 जुलै रोजी नवीनच महिला अधिकारी यांनी येथील टपाल कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. त्या दिवसापासून गेली आठ दिवस ही परिस्थिती आहे. या टपाल कार्यालयाच्या शेटरला ग्रीस न लावल्याने सकाळी महिला अधिकार्‍यांना शटर उघडता उघडत नाही. अनेकदा मदत घ्यावी लागते. टपाल कार्यालयात स्वच्छतागृह, शौचालय नसल्यामुळे इमारतीला रस्त्यावरून वळसा घालून मागच्या बाजूला अधिकारी व कर्मचार्‍यांना जावे लागत आहे. हात धुण्यासाठीही पाण्याची सोय नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे टपाल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते कार्यालयात शिरते. यासाठी प्लास्टिक शीट लावण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना टपाल कार्यालय दिसून येत नाही. चिचुंद्री, उंदरांचा वावर फरशिवरून सतत होत असल्याने व जमिनीवरील फरशीवर पाणी येत असल्याने चक्क अधिकारी मांडी घालून तासंतास टपाल कार्यालयात कामकाज करीत आहेत. दुपारचे जेवणही येथील अधिकारी व कर्मचारी आजूबाजूच्या परिसरात जाऊन करीत आहे. इतकी बिकट परिस्थिती येथील कार्यालयात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित वरिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष न करता येथील टपाल कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांची होणारी कुचंबणा त्वरित थांबवावी, अशी मागणी टपाल कार्यालयात येणार्‍या एजंट, ग्राहक, नागरिक यांच्याकडून होत आहे.

गेल्या आठ दिवस आधी मी येथील टपाल कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. सकाळी नऊ वाजता टपाल कार्यालयात येत असते. महिला असल्यामुळे शटर लवकर उघडता येत नाही. दररोज टपाल कार्यालयात पाय ठेवताच दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. स्वच्छता कर्मचारी दुपारी येत असल्याने गेली चार दिवस मीच वायफरच्या साहाय्याने फरशी पुसून कामकाज सुरू करते. चिचुंद्री, उंदरांचा वावर असल्यामुळे खुर्चीवर पाय वर करून मांडी घालून काम करावे लागत आहे. अनेकदा वरिष्ठांना तक्रार करूनही दखल घेत नाहीत.
                                                              – मोनिका जैन, पोस्ट ऑफिसर

टपाल कार्यालयात पाणी गळती होत असल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीच्या मालकाला तसे कळविले आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्ती करून देत आहेत. त्यानंतर मी स्वतः पाहणी करणार आहे. तेथील पाहणी करून सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतील.
– नितीन बने, पिंपरी पोस्ट ऑफिस जनसंपर्क डाक निरीक्षक

 

आम्ही दररोज आरडीचे पैसे जमा करण्यासाठी येथील टपाल कार्यालयात सकाळी बारा ते पंधरा जणी येत असतो. या वेळी कार्यालयात पाण्याची गळती होते असते. तसेच, चिचुंद्री, उंदरांचा वावर असतो. पोस्ट ऑफिसमध्येशौचालय, पाण्याची सोय करावी
– महिला एजंट, जुनी सांगवी

SCROLL FOR NEXT