पुणे

दापोडी : जुनी सांगवीत पावसातही रस्त्याची कामे

अमृता चौगुले

दापोडी : जुनी सांगवीतील पवारनगर गल्ली नंबर दोन येथे गेल्या वर्षापासून रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या पावसाळ्यातही रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरामधील मे अखेर रस्ता खोदाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असतानाही जुनी सांगवी परिसरात भर पावसात रस्त्याचे काम केले जात आहे.

त्यामुळे स्थानिकांनी ठेकेदाराची चौकशी करून काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ठेकेदारांमार्फत जुनी सांगवीतील रस्ते जुलै महिन्यातही खोदले जात आहेत. तरीही ह प्रभाग स्थापत्य अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.

प्रभाग क्रमांक 32 आताचा नवीन प्रभाग क्रमांक 46 पवारनगर रस्ता क्रमांक 2 मध्ये पावसाळयातच खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम ठेकेदाराकडून संथ गतीने सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. मागिल 7 दिवसांपूर्वी मनसेकडून या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळेस खूपच वाईट परिस्थिती होती. तेथील रस्ता खोदला होता. परंतु, पण काम मात्र बंदच होते. मागील महिन्यातही स्टॅाम वॅाटर लाईनचे अनेक चेंबर खोदलेले होते.

पिण्याच्या पाण्याची लाईन खोदलेली होती. तेथील ठेकेदाराच्या सुपरवाझरला सांगून रस्त्यातील माती जेसीपीने दूर करून घेतले होती. पावसामुळे गाडी घसरून अपघात झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने पाऊस सुरू होण्याआधी काम वेळेत पूर्ण केली नाहीत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर काम पूर्ण करावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिक राजू सावळे, मंगेश भालेकर, साईराज भोसले, सुरेश सकट, चेतन चोटालीया यांनी दिला आहे.

पाइपलाइन तुटल्या
जुलै महिन्यात सतत पाऊस सुरू आहे. पावसात खोदाई केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. रस्ता खोदल्याने नागरिाकंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घराबाहेर पडताच येत नाही. परिसराात कचर्‍याची गाडी येत नाही, ड्रेनेज लाईन आणि नळाच्या लाईन तुटल्या आहेत. तर, काही लाईट केबल तुटले आहेत.

SCROLL FOR NEXT