खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : तोरणागडाच्या बिन्नी दरवाजाच्या डागडुजीचे काम रेंगाळल्याने चार महिन्यांपासून गड पर्यटकांसाठी बंदच आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या काळात पर्यटकांना वेल्हे येथून माघारी जावे लागत आहे. तसेच, वेल्हे -तोरणा परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गडावर जाण्यासाठी वेल्हेमार्गे बिन्नी दरवाजा हा प्रमुख मार्ग आहे. बिन्नी दरवाजासह गडावरील विविध डागडुजीच्या कामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात करण्यात आली. डागडुजीमुळे गडावर ये-जा करणारा मुख्य मार्ग पर्यटकांना बंद करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून गड बंद असल्याने वेल्हे, तोरणा परिसरातील खाद्यपदार्थ विक्री, हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. पर्यटकांअभावी व्यवसाय जवळपास ठप्प आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणागड जिंकून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवकाळानंतर प्रथमच बिन्नी दरवाजाच्या डागडुजीचे काम केले जात आहे. अडचणीच्या ठिकाणी बांधकाम करताना खबरदारी घ्यावी लागत आहे, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले. वेल्हे येथील हॉटेल व्यावसायिक सुनील गाडे म्हणाले, की कोरोनानंतर प्रथमच पर्यटन वाढले आहे. मात्र, तोरणागड बंद असल्याने पर्यटक येत नाहीत. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावू लागली आहे.
शंभर मजूर, वीस गवंडी कामाला
निमुळत्या, उंच कड्यावर अत्यंत बिकट ठिकाणी असलेल्या बिन्नी दरवाजाचे बांधकाम ढासळू लागले होते. दगड, तट पडले होते. त्यामुळे दरवाजा जमीनदोस्त होऊन मुख्य मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने पुरातत्त्व खात्याने दरवाजाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तटबंदीत असलेल्या कड्यावर दरवाजा आहे. एका बाजूला खोल दरी आहे. शंभर मजूर, वीस गवंडी काम करीत आहेत.
अन्य मार्गांचा वापर कमी
डिसेंबर महिन्यात तोरणागडाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. तेव्हापासून मुख्य बिन्नी दरवाजामार्गे बंद आहे. थोडेफार पर्यटक मेटपिलावरे मार्गे गडावर येतात. मात्र, हा मार्ग दूर अंतराचा व खडतर मार्ग आहे.
निम्म्याहून अधिक काम पूर्ण
बिन्नी दरवाजाच्या डागडुजीचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. दगडाचे तीन थर बसविण्याचे काम राहिले आहे. मात्र मजूर, गवंडी यात्रेसाठी गेल्याने काही दिवस काम बंद आहे. तसेच, तोरणाजाई मंदिर, तळे, म्हसोबा टाके, श्री मेंगाईदेवी मंदिर आदींची दुरुस्ती कामे सुरू आहेत.
साडेचार कोटींचा निधी
तोरणागडाच्या डागडुजीसाठी राज्य सरकारने साडेचार कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व खात्याला दिला आहे. वेल्हे मार्गावरील तोरणागडाचा मुख्य बिन्नी दरवाजा व मार्गाच्या दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात केले जात आहे. गडावरील पुरातत्त्व खात्याचे पहारेकरी दादू वेगरे यांच्यासह सुरक्षारक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.