देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज आषाढी पायीवारीला यंदा 28 जूनपासून संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरापासून सुरुवात होणार आहे. प्रस्थानानंतर ती 16 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपुरात दाखल होईल. दरम्यान, ज्येष्ठ आषाढ शुद्ध एकादशी ते ज्येष्ठ आषाढ शुद्ध गुरू पौर्णिमेपर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर (नवीन इमारत) प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे, अशी माहिती देहू देवस्थान संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त यांनी गुरुवारी (दि.25) दिली.
संत तुकाराम महाराज 339 व्या आषाढी पायीवारी सोहळा प्रस्थान व आगमन या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे आदी उपस्थित होते. देहू देवस्थानातर्फे पंढरपूरमधील मुख्य मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर संत श्रीतुकाराम महाराज मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याठिकाणी मुक्कामी राहणार आहे. दि.21 जुलै रोजी आषाढी पायी वारी सोहळ्याचा परतीचा प्रवास श्रीक्षेत्र पंढरपूर येथून होणार आहे.
श्रीनिवडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठ पुणे येथून 2 जुलै रोजी पालखी निघाल्यानंतर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये नेहमीच्या ठिकाणी न करता लोणी काळभोर कदमवाकवस्तीतील नवीन पालखी तळावर मुक्कामी राहील. लोणी काळभोर ग्रामस्थांच्या मान्यतेने हा बदल केला असल्याचे माणिक महाराज मोरे यांनी सांगितले. यंदा पालखी सोहळ्यात 66 दिंड्यांनी वाढ झाली आहे. पालखी रथाच्या पुढे 26 दिंड्या तर मागे 369 दिंड्या असणार आहेत. कोकणातील एक दिंडी तर मराठवाडा विदर्भ भागातील या दिंड्यांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा