तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी भाताच्या लागवडी सुरू झालेल्या आहेत. मुसळधार पाउस पडत असल्याने खरीप भात पीक घेणार्या शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी संपूर्ण जून महिना पावसाने प्रचंड ताण दिला होता. त्यामुळे मावळातील खरीप भात पिकाच्या लागवडी खोळंबल्या होत्या.
खरीप भाताचे पीक हे मावळ तालुक्याचे मुख्य पीक असून यावर्षी लागवडी लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. गेल्या रविवारपासून मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवनानगर परिसरात या पावसाचा सर्वांधिक जोर आहे. त्यामुळे शेतातील भात खाचरे पाण्याने भरले आहेत.
शेतकर्यांनी शेतात लागवडीस सुरुवात केली आहे. भात लागवडीसाठी लागणारा मजूर वर्ग उपलब्ध करण्यासाठी शेतकर्यांची धावपळ होताना दिसत आहे. तर, काही ठिकाणी मजूरच उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर तसेच नातेवाइकांना बोलवून त्यांच्या मदतीने भात लागवडी करून घेत आहे. मावळ तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, महिनाभर मान्सूनच्या पावसाने ताण दिलेला दिलेला होता. परंतु, गेली काही दिवसांपासून एकाच वेळी सर्व भागात पाऊस होत आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लागवडी सुरू केल्या असल्याने मजूर मिळणे आणि त्यांच्या अटी मान्य करून घेणे शेतकर्यांना जड जात आहे.