तळेगाव दाभाडे : गेल्या दहा-बारा दिवसांपासून मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात पिकाच्या खाचरामध्ये प्रचंड पाणी तुंबले आहे. त्यामुळे भात लागवडी काही ठिकाणी खोळंबल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण झाले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे.
जोरदार पावसाने भात शेतीतील भात खाचरे भरून गेलेली आहेत. तुडुंब भरलेल्या खाचरातील पाणी वसरेपर्यंत भात लागवडीत करणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. मावळ तालुका हा खरीप भात पीक घेणारा प्रमुख तालुका आहे. या तालुक्यात 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाणही सर्वांधिक आहे.
या पावसावर खरीप भात पिकाची लागवड केली जाते. यावर्षी संपूर्ण जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने पूर्ण उघडीत दिली होती. काही शेतकर्यांनी विहिरी, नद्या, तलावाचे पाण्यावर भातरोपे पेरली होती. मात्र, या पावसाने सुमारे महिनाभर ताण दिला होता. सध्या मावळत सतत मुसळधार पाऊस पडत असून काही ठिकाणी या पावसाचा जोर अधिक आहे. भात लागवडी करण्यासाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.